Crop Loan Maharashtra : जसा पावसाळा संपला, तशी खरीप पीक कर्जवाटपाची मुदतही संपली. मात्र, बँकांनी हात आखडता घेतल्याने सर्व बँकांचे (Bank Loans) कर्जवाटप 83.75 टक्क्यांवर थांबले. आता रब्बी हंगामासाठीही शेतकरी बँकांच्या पायऱ्या झिजवणार आहेत. मात्र, बँकांनी सकारात्मकता दाखविली तरच शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे.
खरीप हंगामासाठी राष्ट्रीय, खासगी व सहकारी बँकांना दोन लाख शेतकऱ्यांना 2,498 कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात 2,090 कोटी रुपये इतके पीक कर्ज (Crop Loan) बँकांनी वाटप केले आहे. खरीप कर्जवाटपाची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपली आहे. उद्दिष्टाच्या 83.75 टक्के इतकेच कर्जवाटप झाले आहे.
Crop Loan Maharashtra
रब्बीचे क्षेत्र पाच लाख हेक्टर
सोलापूर जिल्ह्याचे रब्बी पेरणी सरासरी क्षेत्र 4 लाख 85 हजार हेक्टर इतके आहे. मात्र, पेरणीसाठी जमिनीत उपयुक्त ओल नसल्याने रब्बी पेरणीला म्हणावा तितका वेग आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात 46 हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पेरणी झाली आहे. पाऊस नसल्याने ज्वारी पेरणी क्षेत्रात मोठी घट होईल, असा अंदाज आहे.
शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्यावर गहू व हरभऱ्याची पेरणी होईल, असे सांगण्यात आले.- मागील वर्षीपेक्षा यंदा रब्बी पेरणीचे उद्दिष्ट 31 हजार हेक्टरने वाढविले आहे. रब्बी हंगामासाठी सरकारी, खासगी व सहकारी बँकांना 1,871कोटी 45 कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आता बँकांचा कर्जवाटपाचा वेग किती राहणार, यावर उद्दिष्ट अवलंबून आहे.