Crop Insurance : रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना मिळणार 1 रूपयांत पीक विमा.!

Crop Insurance : यंदाच्या खरिप हंगामासाठी राज्य सरकारने १ रूपयांत पंतप्रधान पिक विमा योजनेची (PMFBY) घोषणा केली होती. या योजनेचा लाभ राज्यातील तब्बल १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी घेतला. पण पावसाच्या लपंडावामुळे येणारा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असणार आहे. पाण्याची कमतरता असल्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना येणाऱ्या रब्बी हंगामासाठी सुद्धा १ रूपयांत विमा योजनेचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी केली आहे.

रब्बी हंगाम आढावा बैठक पुण्यातील साखर संकुल येथे पार पडली. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे बोलत होते. त्यांनी रब्बी हंगामासाठी बियाणांची उपलब्धता, खतांची उपलब्धता, हंगामासाठी प्रस्तावित क्षेत्र, उन्हाळी पाण्याचे आवर्तने, चाऱ्यासाठी प्रस्तावित क्षेत्रे आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्ताने पिकांमध्ये करण्यात आलेले फेरबदल यावर चर्चा केली. तर यावर्षी जनावरांना चारा कमी पडणार असून चारा पिकावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Crop Insurance

फक्त एक रूपयांत विमा

खरिप हंगामात सरकारच्या एका रूपयांत पिक विमा योजनेचा (Crop Insurance Scheme) लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ८ हजार १३.९४ कोटी रूपयांपैकी ३ हजार ५०.२२ कोटी रूपयांचा विमा हप्ता अनुदान रक्कम विमा कंपन्यांना अदा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या हंगामातही शेतकऱ्यांना केवळ १ रूपयांत विमा योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं आहे.

खरीप पिकाच्या विम्यासाठी अर्ज करतेवेळी शेतकऱ्यांकडून रक्कम उकळल्याचाही आरोप अनेकांकडून करण्यात आला होता. तर विमा घेण्यासाठी दुसऱ्याच्या जमिनी आपल्या नावावर दाखवून विम्याची रक्कम लाटल्याचाही प्रकार उघडकीस आला होता. अशा शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

Leave a comment