Cotton Market : कापसाचे दर ७,२०० रुपयांच्या आसपास स्थिरावणार

Cotton Market : यंदा कापसाला किमान १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असली तरी कापसाचा जागतिक बाजार आणि मंदी विचारात घेता हे दर प्रति क्विंटल ७,२०० रुपयांच्या आसपास स्थिर राहतील. जागतिक मंदीमुळे दरवाढीची शक्यता मावळली असून, कापसाचे दर (Cotton Rate) हे सरकीच्या दरातील चढ-उतारावर अवलंबून राहतील, असा अंदाज शेतमाल बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सन २०२३-२४ च्या हंगामासाठी केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाची (Cotton Price) किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ७,०२० रुपये तर मध्यम धाग्याच्या कापसाची एमएसपी ६,६२० रुपये जाहीर केली आहे. सध्या सरकीचे दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल असल्याने कापसाला प्रति क्विंटल ७,००० ते ७,३०० रुपये दर मिळत आहे. सरकीचे दर कमी-अधिक झाल्यास कापसाचे दर सरासरी २०० रुपये प्रति क्विंटलले कमी-अधिक हाेतील.

Cotton Market

जागतिक बाजारात तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दरात घसरण सुरू आहे. महागाई नियंत्रणाच्या नावाखाली केंद्र सरकार खाद्यतेलाची माेठ्या प्रमाणात आयात करीत असून, तेलबियांचे दर नियंत्रित करीत असल्याने तसेच सरकीच्या ढेपेला दुधकांडी हा स्वस्त पर्याय बाजारात उपलब्ध सरकीचे दर वाढण्याची शक्यताही मावळली आहे.

त्यामुळे कापसाचे दर प्रति क्विंटल ७,२०० रुपयांच्या आसपास राहणार असल्याचे जिनिंग व्यावसायिक विजय निवल यांनी सांगितले तर, कापसाला सरासरी ७,५०० रुपये दर मिळणार असल्याचा अंदाज कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक गाेविंद वैराळे यांनी व्यक्त केला आहे.

1 thought on “Cotton Market : कापसाचे दर ७,२०० रुपयांच्या आसपास स्थिरावणार”

Leave a comment